वसई/ वसई तालुका आणि पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना चांगल्या क्रीडासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेतर्फे विरार येथील म्हाडा मैदानात क्रीडासंकुल उभारण्यात येणार आहे. मात्र या क्रीडा संकुलाचे भूमीपूजन झाले असले तरी बांधकाम मात्र चार महिन्यांपासून रखडले आहे. या ठिकाणी बांधकाम साहित्य आणून ठेवण्यात आले. मात्र तेही धूळ खात पडले आहेत. वसई-विरार शहरातील खेळाडूंना आजही मुंबईतील मैदानावर सराव करण्यासाठी जावे लागत आहे. यासाठी शहराच्या ठिकाणीच विविध प्रकारे खेळ खेळता यावे आणि त्याचा चांगला सराव करता यावा यासाठी पालिका क्षेत्रात क्रीडासंकुल तयार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे विरार येथील म्हाडा मैदानात क्रीडासंकुल तयार करण्याचा निर्णय घेऊन नोव्हेंबर २०१७ मध्ये भूमिपूजन करून या कामाची सुरुवात करण्यात आली होती. या कामासाठी महापालिकेने ३० कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये लांब उडी, गोळाफेक, ४०० मीटरचा सिंथेटीक रिनंग ट्रॅक, उंच उडी, भालाफेक, थाळीफेक, हातोडाफेक, फुटबॉल इत्यादी खेळांच्या सुविधांसह बास्केटबॉल, टेबलटेनिस, बॅडमिंटन, योगा अभ्यासाठी सुविधा, मार्शल आर्ट अशा विविध सुविधा यांमध्ये उपलब्ध होणार आहेत. यासाठी हे काम जवळपास दीड ते दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे पालिकेने सांगितले होते. परंतु कामाची सुरुवात होऊन बहुतेक कामही पालिकेने पूर्ण केली आहेत. परंतु मागील चार ते पाच महिन्यांपासून हे काम बंद आहे. या बांधकामासाठी आणलेले सर्व साहित्य यामुळे धूळ खात असून लोखंडी वस्तूही गंजून गेल्या आहेत. तसेच आजूबाजूला गवतही वाढले आहे. जर सर्व साहित्य असेच पडून राहिले तर हे साहित्य भंगारात जाईल यासाठी पालिकेने याकडे लक्ष देऊन या क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करून चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मध्यंतरी पावसामुळे काम बंद होते. त्यानंतर त्यामधील आरखडय़ात बदल करून त्यामध्ये तरणतलावाचाही समावेश केला असून त्या कामाची सुरुवात केली असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून काम सुरू करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील सोमवारपासून कामाची सुरुवात करण्यात आली आहेत. पुढील कामेही जलदगतीने पूर्ण करून खेळाडूंना चांगले मैदान उपलब्ध केले जाईल
क्रीडा संकुलाच्या कामांची रखडपट्टी